Hingoli Traffic Branch: हिंगोलीमध्ये दुपारच्या वेळ

हिंगोली शहर वाहतूक शाखेवर मोकाट जनावरे हाकलण्याची वेळ; नांदेड नाक्यावरील वाहतूक अखेर सुरळीत

Hingoli Traffic Branch

हिंगोली (Hingoli Traffic Branch) : शहरातील नांदेड नाका परिसरातील मेन रोडवर आज दुपारी अचानक मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसल्याने काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. गर्दीच्या वेळेत रस्त्याच्या मधोमध जनावरे बसल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती नागरिकांमध्ये होती.

घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शिवाजी पारीसकर आणि चालक गजानन दांडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः जनावरे हाकलून रस्ता मोकळा केला आणि वाहतूक पूर्ववत सुरळीत केली. शहर वाहतूक शाखा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला.

नांदेड नाका (Hingoli Traffic Branch) हा शहरातील प्रमुख प्रवेशद्वार असून या ठिकाणाहून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. रस्त्यावर जनावरे बसल्यामुळे अपघाताचा धोका नेहमीच असतो. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे नगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वारंवार अशा घटना घडत असूनही यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यासाठी कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हिंगोली शहरांमध्ये मोकाट जनावरांची डोकेदुखी कायम आहे. या मोकाट जनावरांना पकडण्यात येत नसल्याने भर रस्त्यात ठाण मांडून बसत आहेत. परिणामी अधून मधून त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.