लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या प्रसिद्ध आई एकव

आई एकविरा देवी मंदिराचा चोरीला गेलेला कळस ८ वर्षांनी सापडला

Stolen Kalash Found

भाविकांमध्ये आनंद

लोणावळा (Stolen Kalash Found): लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या प्रसिद्ध आई एकविरा देवी मंदिरातील २०१७ मध्ये चोरीला गेलेला पंचधातूचा आणि सोन्याचा मुलामा असलेला कळस अखेर शोधण्यात यश आले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर हा कळस पुन्हा मंदिरात परतल्याने भाविकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

३ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यावरील सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा कळस अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. हा कळस पंचधातूपासून बनवलेला असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा कळस एका भक्ताने श्रद्धेने दान दिलेला होता.

घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र सुरुवातीला आरोपींचा ठावठिकाणा लागत नसल्याने हा तपास पुढे स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) वर्ग करण्यात आला. सखोल तपासानंतर राहुल गावंडे आणि सोमनाथ गावंडे या दोघांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, या आरोपींनी यूट्यूबवरील एका गाण्यात कळस सोन्याचा असल्याचे पाहून चोरी करण्याची योजना आखली होती.

अटक झाल्यानंतरही कळसाचा शोध सुरूच होता. अखेर पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा कळस हस्तगत करण्यात आला असून तो पुन्हा मंदिरात आणण्यात आला आहे.

आई एकविरा देवी हे महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान मानले जाते. तसेच हे ठाकरे कुटुंबाचे कूळदैवत असल्याने या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. कळस परत मिळाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.