शिक्षिकेचा पाठलाग करून मोबाईल क्रमांकाची मागणी; चिखलीतील तरुणाविरुद्ध गुन्हा
चिखली : चिखली येथील शिक्षक कॉलनी परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरत मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी चिखली शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २९) सकाळी ८.४५ ते ८.५० वाजण्याच्या सुमारास अर्बन विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात ही घटना घडली. फिर्यादी शिक्षिका शाळेकडे जात असताना आरोपी अकील अहमद अब्दुल अहमद (रा. चिखली) याने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर, "तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे," असे म्हणत त्याने त्यांच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने चिखली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ६४३/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक भूषण गावंडे व पोलीस उपनिरीक्षक सुसर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास चतरकर करीत आहेत.