'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज

'सैराट' फेम अरबाज शेखच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे यांच्या FDA कडून नोबल हॉस्पिटलवर कारवाई

Solapur Nobel Hospital

वडिलांच्या उपचारादरम्यान जबरदस्तीने हॉस्पिटलमधील मेडिकलमधून औषधे घ्यायला लावल्याचा अरबाज शेखचा आरोप; तुकाराम मुंढे यांच्या FDA कडून तपासात गंभीर त्रुटी आढळल्यानंतर तातडीची कारवाई

मुंबई : 'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक व्हिडिओनंतर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटल चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. वडिलांच्या उपचारादरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने स्वतःच्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप अरबाजने केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने रुग्णालयाची तपासणी केली असून, हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने तेथील औषध विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अलीकडेच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना केवळ रुग्णालयातील अधिकृत फार्मसीमधूनच औषधे घेण्यास भाग पाडणाऱ्या संस्थांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर अरबाज शेखच्या व्हिडिओमधील आरोप समोर आल्यानंतर FDA चे पथक सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि सखोल तपासणी सुरू करण्यात आली.

तपासादरम्यान सोलापूरचे सहायक अन्न व औषध आयुक्त अरुण गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटल परिसरातील फातिमा फार्मसीची पाहणी करण्यात आली. या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित मेडिकलमधील औषध विक्री तातडीने थांबवण्याचे आदेश प्रशासनाने दिले.

अरबाज शेखने व्हिडिओत काय आरोप केले?

अरबाज शेखने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज आणि त्यानंतर हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला ₹10 हजारांची ठेव (डिपॉझिट) भरल्यानंतर औषधांची यादी देण्यात आली. बाहेरून औषधे आणण्याची परवानगी मागितल्यावर हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे आणि इंजेक्शन खरेदी करावी लागतील, असे सांगण्यात आल्याचा त्याचा दावा आहे.

अरबाजच्या म्हणण्यानुसार, हॉस्पिटलच्या मेडिकलमधून घेतलेल्या औषधांचे बिल ₹40 हजारांपेक्षा अधिक झाले. तीच औषधे बाहेरून घेतली असती तर जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध झाली असती, असा त्याचा आरोप आहे. या अनुभवामुळे वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागल्याचेही त्याने व्हिडिओमध्ये सांगितले. यावेळी तो भावूक होत वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहनही करताना दिसला.

सैराट मधील सल्या उर्फ अरबाजचा व्हिडिओ पाहा...वडील सिरीयस असताना सोलापुरातील नोबल हॉस्पिटल ने त्यांच्याच स्टोअर मधून वाढीव दरात औषधे घ्यायला लावली...बाहेर अर्ध्या दरात मिळत असताना...या हॉस्पिटल वर शासनाने कारवाई करावी.@Dev_Fadnavis @Tukaram_IndIAS pic.twitter.com/7t8feNZaU4

— यदुनाथ जवळकर🔥 (@yadujavalkar) July 9, 2026

हॉस्पिटल प्रशासनाने आरोप फेटाळले

अरबाज शेखच्या आरोपांनंतर नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी रुग्णालयाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अरबाज यांच्या वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि त्यांना आवश्यक तेवढीच औषधे देण्यात आली. रुग्णांना हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची कोणतीही सक्ती करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला.

डॉ. सय्यद यांनी पुढे सांगितले की, रुग्णाच्या उपचारासाठी लागणाऱ्या संभाव्य खर्चाची माहिती नातेवाईकांना आधीच देण्यात आली होती. अरबाजने असे आरोप का केले, याची माहिती नसल्याचे सांगत त्यांनी रुग्णालयाकडून कोणतीही चूक झालेली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, या विषयावर त्यांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सध्या FDA कडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.