सोशल मीडियाच्या तत्परतेमुळे आठ दिवसांपासून बेपत्ता ज्येष्ठ नागरिक कुटुंबास परत
बापूराव घोंगडे यांच्या प्रयत्नांना यश
हिंगोली (Senior citizens missing Case) : सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून पिंपळदरीचे सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांच्या प्रसंगावधानामुळे हिंगोली बसस्थानकावर गोंधळलेल्या अवस्थेत सापडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला अवघ्या एका तासात कुटुंबाची भेट घडवून दिली. आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वडिलांना पाहून कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
विदर्भातील उमरखेड जवळील पिंपळदरी येथील 65 वर्षीय माधव बालाजी रिठ्ठे हे 10 दिवसांपूर्वी गावातील काही लोकांसोबत देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. पंढरपूर येथे गर्दीत त्यांची गटातील इतर लोकांशी चुकामुक झाली. दोन्ही बाजूंनी शोधाशोध झाली, मात्र माधव घरी परतले असावेत या समजुतीने इतर मंडळी गावी परतली. दरम्यान, माधव पूर्णपणे गोंधळून गेले. पत्ता नीट सांगता येत नसल्याने ते तब्बल आठ दिवस पंढरपूरमध्येच अडकून पडले. अखेर एका व्यक्तीने त्यांना हिंगोलीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवले.
सोमवारी सकाळी माधव हिंगोली बसस्थानकावर उतरले. त्यांच्या पायाला गंभीर जखम झालेली दिसून आली. (Senior citizens missing Case) उपस्थित नागरिकांनी विचारपूस केली असता त्यांनी नाव रिठ्ठे व गाव पिंपळदरी असल्याचे सांगितले. नागरिकांनी तात्काळ औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांना याची माहिती दिली. घोंगडे यांनी गावात चौकशी केली, मात्र माधव या गावचे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी वेळ न दवडता रिक्षाचालका मार्फत माधव यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
त्याचवेळी घोंगडे यांनी माधव यांचा फोटो व माहिती सोशल मीडियावर, विशेषतः मराठवाडा व विदर्भातील विविध ग्रुपवर शेअर केली. या पोस्टला तत्काळ प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या एका तासात माधव यांच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचली. कुटुंबाने तात्काळ घोंगडे यांच्याशी संपर्क साधला व माधव हे विदर्भातील पिंपळदरी येथील असल्याचे सांगितले. काही वेळातच माधव यांची दोन्ही मुले हिंगोलीत दाखल झाली. आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वडिलांना सुखरूप पाहून त्यांना मोठा दिलासा मिळाला.