Hingoli Smart Meter: हिंगोली जिल्ह्यात स्मार्ट मीट

जून्या मीटर सोबत तक्रारीही गेल्या;  स्मार्ट मीटर बसल्याचा परिणाम

Hingoli Smart Meter

डिजीटल व अचूक रिडींगमुळे संशयच संपला

हिंगोली (Hingoli Smart Meter) : हिंगोली जिल्ह्यात महावितरणने राबवलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. जुन्या पारंपरिक मीटरच्या जागी अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलासंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी जवळपास संपुष्टात आल्या आहेत. यामुळे महावितरणच्या मीटर टेस्टिंग विभागातील कामाचा ताण कमालीचा कमी झाला आहे. पूर्वी ‘मीटर जास्त पळते’, ‘वापर नसताना बिल जास्त येते’ अशा तक्रारी घेऊन ग्राहकांची महावितरण कार्यालयात रोज गर्दी असायची. जुने मीटर तपासणीसाठी प्रयोगशाळेत रांगा लागत होत्या. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यापासून हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. (Hingoli Smart Meter) डिजिटल आणि अचूक रीडिंगमुळे बिलाबाबतचा संशयच संपला असून ग्राहक- महावितरण मधील वादाचे प्रसंग थांबले आहेत. आता महावितरणची कार्यपद्धतीही बदलली आहे. कर्मचारी जागेवर जाऊन पाहणी करतात आणि फक्त तांत्रिक बिघाड किंवा शंका असल्यासच मीटर तपासणीसाठी आणले जाते. ग्राहकाने स्वतः लेखी तक्रार दिल्यासच मीटरची पडताळणी केली जाते. सरसकट मीटर टेस्टिंगची पद्धत बंद झाल्याने कर्मचार्‍यांचा वेळ वाचतो आहे आणि ग्राहकांचे कार्यालयातील हेलपाटेही थांबले आहेत. मीटर तपासणी विभागात पूर्वी मीटरचा ढीग असायचा, तिथे आता शुकशुकाट आहे.  केवळ अत्यावश्यक प्रकरणांमधील मोजकीच मीटर तपासली जात आहेत. (Hingoli Smart Meter) वीज वापराचे अचूक वर्गीकरण होत असल्याने ग्राहकांचा महावितरणवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. हिंगोलीत महावितरणचा हा तंत्रज्ञानाधारित बदल ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे.