खासदार देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे

मानोऱ्यात उबाठा शिवसेनेकडून खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

Shoe Protest

पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप; प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून व काळी शाई फासून निषेध

मानोरा (Shoe Protest) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शनिवारी (दि. २० जून) मानोरा शहरातील झेंडा चौक येथे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तसेच तोंडाला काळी शाई फासून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे झेंडा चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.

आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत खासदार संजय देशमुख यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, मात्र त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून विरोधी पक्षाशी मैत्री करत पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते आणि मतदारांचा विश्वासघात झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

​​​​​​​

खासदार संजय देशमुख यांच्या पक्षत्यागाचा निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले तसेच तोंडाला काळी शाई फासून तीव्र संताप व्यक्त केला.

या आंदोलनात शहरप्रमुख संतोष पुरी, तालुका संघटक बाळू राठोड, उपजिल्हाप्रमुख श्याम राठोड, विधानसभा संघटक संतोष पवार, उपतालुका प्रमुख विकास चौधरी, सुभाष जोंधळेकर, सर्कल प्रमुख गणेश राजगुरे, विनोद तुळजापुरे, अशोक ठाकरे, सुरेश अलोटे, बाळू राठोड, विकास ठाकरे, संतोष भुसारी, देवा कुऱ्हाडे, गोपाल चांदोडे, भिमराव राठोड, तानाजी तायडे यांच्यासह शेकडो शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.