'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेत उद्धव ठाकरेंची सूचक पोस्ट; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटाचे ॲक्शन मोड
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत संघर्षाचा संदेश; २० जूनपासून आमदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठका
(Shiv Sena Anniversary) 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेमुळे शिवसेना (ठाकरे गट)च्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे ठाकरे गटासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. मात्र, या संपूर्ण घडामोडींवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा संवेदनशील वातावरणात शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा छायाचित्रासह उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक आणि सूचक संदेश शेअर केला. "किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी" या काव्यपंक्ती पोस्ट करत त्यांनी कोणाचाही थेट उल्लेख टाळला असला, तरी सध्याच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर हा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे. संघर्षाच्या काळानंतर पुन्हा यश आणि उज्ज्वल भविष्य उभे राहील, असा आशावाद या पोस्टमधून व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. /?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" >
दरम्यान, संभाव्य खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या लोकसभा मतदारसंघांतील खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे, त्या मतदारसंघांवर आता 'मातोश्री'कडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. स्थानिक संघटनात्मक स्थितीचा आढावा घेऊन पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
शिवसेनेचा १९ जून रोजी ६० वा वर्धापन दिन साजरा झाल्यानंतर २० जूनपासून महत्त्वाच्या बैठकींची मालिका सुरू होणार आहे. या बैठकींसाठी संबंधित लोकसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, स्थानिक पातळीवरील अडचणी, कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवणे आणि आगामी राजकीय घडामोडींना सामोरे जाण्यासाठी आवश्यक रणनीती यावर या बैठकींमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि संघटनात्मक एकजूट कायम राखणे, हे ठाकरे गटासमोरील प्रमुख आव्हान मानले जात आहे.
२०२२ मध्ये शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला होता. आता २०२६ मध्ये खासदारांच्या संभाव्य फुटीची चर्चा सुरू झाल्याने ठाकरे गट पुन्हा एकदा कठीण राजकीय परीक्षेला सामोरे जात असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरून थेट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, प्रत्येक मतदारसंघातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय संकटाच्या या काळात उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि त्यातून घेतले जाणारे निर्णय ठाकरे गटाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.