हिंगोलीत २७ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा; शिवभक्तांना उपस्थितीचे आवाहन
हिंगोली (Shiv Rajyabhishek) : श्री शिवप्रतिष्ठान विभाग हिंगोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, २७ जून रोजी सकाळी ८.३० वाजता शिवस्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंगोली येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन सर्व धारकरी शिवभक्त, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावर्षीचा सोहळा "शिवराज्याभिषेक मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात" या संकल्पनेवर आधारित असून, "एकच पर्व हिंदू सर्व" आणि "एकच धून २७ जून" असा नारा देण्यात आला आहे.
श्री शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी जास्तीत जास्त संख्येने शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू होणार असल्याने सर्व शिवभक्तांनी १० मिनिटे आधी उपस्थित राहावे, असेही त्यांनी नमूद केले. "तुमचा एक तास मोलाचा, कितीही मोठे काम आपल्या राज्यापेक्षा नाही," असे सांगत त्यांनी सर्व धारकरी शिवभक्तांना या ऐतिहासिक सोहळ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याबाबत शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.