सावरडोह पुलाचा बोजवारा; वळण रस्ता वाहून गेल्याने १० ते १२ गावांचा संपर्क तुटला
बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा फटका; शेतकऱ्यांना ३० किमीचा फेरा
कारंजा (Savardoh Bridge) : बांधकाम विभागाची निष्क्रियता आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाची किंमत आता सावरडोह परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना मोजावी लागत आहे. रखडलेल्या पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेल्याने हजारो नागरिकांचा कारंजा शहराशी संपर्क तुटला आहे. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला असून, एका प्रवासासाठी तब्बल ३० किलोमीटरचा फेरा मारण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
कारंजा-सावरडोह मार्गावरील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता काल झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
सावरडोह परिसरातील गावांचा मुख्य संपर्क कारंजा शहराशी असल्याने शिक्षण, आरोग्य सेवा, बाजारपेठ आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, वाढलेल्या अंतरामुळे त्यांचा खर्चही वाढला आहे.
सध्या पेरणीची लगबग सुरू असून हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणारे साहित्य वेळेत शेतात पोहोचले नाही, तर संपूर्ण वर्षाचे नियोजन कोलमडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू असताना ग्रामीण भागातील नागरिक मात्र एका पुलासाठी आणि पर्यायी रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत. पुलाचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.