रिसोडमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रशासनाचा 'हंटर'; १६ वाहनांवर धडक कारवाई!
RTO, जिल्हा वाहतूक शाखा आणि रिसोड पोलिसांची संयुक्त मोहीम; १ लाख ७३ हजारांचा दंड वसूल, ४ वाहने जप्त
रिसोड (Risod Illegal Passenger Transport) : रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत आज रिसोड परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध प्रशासनाने तीव्र मोहीम उघडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आर.टी.ओ. (RTO) वाशीम, जिल्हा वाहतूक शाखा आणि रिसोड पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केलेल्या धडक कारवाईत एकूण १६ वाहनांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला. या संपूर्ण कारवाईत वाहनधारकांकडून एकूण १,७३,०००/- रुपये इतका मोठा दंड वसूल करण्यात आला आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन व नेतृत्व ही धडक कारवाई वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. आनंद मेश्राम आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. नवदीप अग्रवाल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या मोहिमेचे प्रत्यक्ष मैदानी नेतृत्व रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर चव्हाण आणि नियंत्रक अधिकारी ARTO श्री. संग्राम जगताप यांनी केले. विभागवार कारवाईचा संक्षिप्त तपशील: संयुक्त पथकाने विविध मार्गांवर नाकाबंदी करून संशयास्पद आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली. या महत्त्वपूर्ण मोहिमेत RTO विभागाचे मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट, सहायक मोटार वाहन निरीक्षक रविदास विणकरे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस हवालदार मनोहर वानखेडे, तसेच पोलीस अंमलदार सुधाकर सोन्नर आणि शिवाजी केंद्रे यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून चोख कामगिरी बजावली. प्रशासनाचा इशारा: अवैध प्रवासी वाहतुकीमुळे (Risod Illegal Passenger Transport) प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. वाहतुकीचे नियम मोडून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची गय केली जाणार नाही. येत्या काळातही ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.