‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष
रिसोड (Risod Maharajswa Abhiyan) : दि 27 जुलै 2026 ला महाराष्ट्र शासन, महसूल विभाग, तहसील कार्यालय, रिसोड यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रिसोड येथे आयोजित "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान – समाधान शिबिर" कार्यक्रमात सनराईज इंग्लिश स्कूल, रिसोडच्या इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिमय दिंडीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी भगवान श्री विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या आकर्षक वेशभूषेसह पताकाधारी वारकरी, टाळकरी वारकरी यांच्या रूपात टाळ-मृदंगाच्या गजरात मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. विद्यार्थिनींनी तुळशीवृंदावन घेऊन दिंडीत सहभाग नोंदविल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. उपस्थित नागरिकांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमात महसूल विभागामार्फत विविध शासकीय योजनांची माहिती, लाभ वितरण तसेच नागरिकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमास उपस्थित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, मान्यवर व आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे, संस्कारपूर्ण सादरीकरणाचे आणि वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविणाऱ्या दिंडीचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी सनराईज इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमुख, दि आर्य शिक्षण संस्था, रिसोडचे अध्यक्ष श्री. अनंतरावजी देशमुख, विश्वस्त श्री. चैतन्यभैया देशमुख तसेच संस्थेचे सचिव ॲड. नकुलदादा देशमुख, सौ. अमृताताई नकुल देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय सहभागाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा संस्कारक्षम उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा, सामाजिक मूल्ये आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ. रोजमेरी जोस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वर्गशिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिमय दिंडीमुळे सनराईज इंग्लिश स्कूलच्या सांस्कृतिक व संस्कारक्षम कार्याचा ठसा उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या मनावर उमटला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच संस्थेच्या व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.