पुणे महापालिकेतील सत्तासमीकरणात राष्ट्रवादी काँग्

पुणे महापालिकेच्या सत्तेत वाटा हवा; राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडेंचे संकेत

Pune Municipal Corporation

राज्यातील सत्तेत आम्ही भागीदार आहोत, मग पुण्यात विरोधी बाकांवर का बसायचं?; सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि वरिष्ठ नेतृत्व घेणार अंतिम निर्णय

पुणे: पुणे महापालिकेतील सत्तासमीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सहभागी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षाला महापालिकेतील सत्तेत स्थान मिळावे आणि उपमहापौरपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यावी, अशी भूमिका पक्षाचे नेते संजय काकडे यांनी मांडली आहे. या संदर्भात ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. मात्र राज्यात महायुती सरकारमध्ये पक्ष सत्तेचा भाग असल्याने पुणे महापालिकेतही सत्तेत सहभागी होण्याची गरज असल्याचे काकडे यांनी सांगितले. याबाबत अंतिम निर्णय सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी नमूद केले.

काकडे म्हणाले की, महापालिका निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही इच्छा होती की, पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत काही महत्त्वाची पदे मिळावीत. पक्षाकडे सुमारे २२ ते २३ नगरसेवक असल्याने उपमहापौरपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. मुंबईसह इतर महापालिकांमध्ये सत्तेला पाठिंबा देणाऱ्या घटक पक्षांना विविध पदांची संधी मिळाली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौरपद मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

"राज्य आणि केंद्रातील सत्तेत आम्ही सोबत आहोत. अशा परिस्थितीत पुणे महापालिकेत विरोधी बाकांवर बसण्याचे कारण नाही. त्यामुळे सत्तेत सहभाग आणि उपमहापौरपदाबाबत आम्ही पक्ष नेतृत्वाकडे प्रस्ताव मांडणार आहोत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल," असेही संजय काकडे यांनी स्पष्ट केले.