NEET आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी; व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
मुंबई : NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ मुंबईत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये आंदोलनात ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला सध्याच्या नियुक्तीवरून हटवत चौकशीचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडियावर 'दहिसरकर' या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी पोलीस वाहनात बसलेले दिसतात. त्याचवेळी वाहनातील एक पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेत धमकावत असल्याचे कथितपणे ऐकू येते. "पुन्हा आंदोलनात दिसलात तर ५० ग्रॅम पावडर (ड्रग्स) खिशात टाकू आणि अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवू. पुन्हा समोर आलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल," अशा आशयाचे वक्तव्य त्या व्हिडिओमध्ये असल्याचा दावा केला जात आहे.
याच व्हिडिओतील दुसऱ्या भागात संबंधित कर्मचारी विद्यार्थ्यांना उद्देशून, "फिर मेरे जैसा कोई बेकार आदमी नहीं... वापस इधर मिला तो 50-50 ग्राम पाउडर जेब में डाल देगा, फिर गया तू... फिर जमानत," असे बोलताना ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असतील, तर ते लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्यावरील जनतेच्या विश्वासासाठी गंभीर बाब असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात आली.
The Mumbai Police are threatening students who are protesting, warning that if they return, they will be framed in a drug case and end up spending their entire lives in jail. pic.twitter.com/6b7J7AeJ93
— Bhavesh Makwana (@Bhaveshmakwana_) July 23, 2026दरम्यान, मुंबई पोलिसांनी या व्हिडिओची तातडीने दखल घेतली आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या विद्यमान नियुक्तीवरून हटवण्यात आले आहे. चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन निषेध नोंदवला. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ, नसीम खान आणि भाई जगताप यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेण्याची माहिती देण्यात आली.
माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत असून तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून अशा प्रकारची वागणूक योग्य ठरू शकत नाही. "गुंडागर्दीनंतर आता पोलिसगर्दी सुरू झाली आहे. आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही," अशी भूमिका त्यांनी मांडली.
याशिवाय, व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप समोर येत असल्याचे सांगत त्यांनी ही बाब पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि पोलीस यंत्रणेच्या कामकाजाबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे सांगितले की, या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाच्या कारभारावरही त्यांनी टीका करत, सध्याच्या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि त्यातील संभाषणाची पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.