राज्यमार्गाची झाली अवदसा...पेंढरी-नवरगाव मार्गावर चार वाहने चिखलात रुतली, २ तास वाहतूक ठप्प
सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
सिंदेवाही (State highway traffic) : तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेंढरी - नवरगाव राज्यमार्गावर काल रात्रौ १०.४५ वाजताच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट आणि दुर्लक्षित कारभाराचे विदारक चित्र पाहायला मिळाले. रेतीने भरलेला एक अवजड ट्रक रस्त्यावर फसल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ एक अशा तब्बल चार वाहनांचा चिखलात खोळंबा झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास २ तास पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास नवरगाव कडून रेती घेऊन जाणारा एक अवजड ट्रक पेंढरी-नवरगाव मार्गावर हेमंत लाडे यांच्या शेतानजीक परिसरातील राज्य मार्गावर चिखलात रस्ता खचल्याने रस्त्याच्या मध्यभागीच फसला. तो रात्रभर तिथेच पडून होता. त्यानंतर सकाळी दुसरा ट्रक तिथून जात असताना, फसलेल्या ट्रकला वळसा घालून बाजूने मार्ग काढण्याच्या प्रयत्नात तोही त्याच चिखलात जाऊन फसला. एवढ्यावरच हे सत्र थांबले नाही; पाठोपाठ आलेल्या दोन पिकअप गाड्यांनीही बाजूने निघण्याचा प्रयत्न केला असता त्याही दलदलीत रुतल्या.
एकापाठोपाठ चारही वाहने रस्त्यावरच अडकल्यामुळे महामार्गाचे स्वरूप एखाद्या दलदलीसारखे झाले होते. दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांना अन् वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अखेर स्थानिक प्रशासनाने व ग्रामस्थांनी पुढाकार घेत तब्बल २ जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने कठोर कसरतीनंतर अडकलेली वाहने बाहेर काढली. २ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
वाहतुक सुरू झाली परंतु एक ट्रक तब्बल १५ ते १६ तासानंतर काढण्यात यश आले परंतु धोका अजूनही टळला नसून तिथे जी दलदल निर्माण झाली आहे तिथी अजूनही वाहने फसण्याची शक्यता असल्याने नागरीक संताप व्यक्त करीत आहेत
सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्नांची सरबत्ती
राज्यमार्गाचा दर्जा असलेल्या रस्त्याची ही दैना पाहून स्थानिक नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. "हा रस्ता नक्की जड वाहतुकीसाठी बनवला आहे की केवळ दाखवण्यासाठी?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. रस्त्यांची झालेली चाळण आणि निकृष्ट कामांमुळे दररोज अपघाताची भीती निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून केली जात आहे. यावेळी वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीसांना पाचारण करण्यात आले होते .
वास्तविक पहाता ह्या राज्यमार्गाचा दर्जा असलेल्या रस्त्याचे रुंदिकरण आणि कॉक्रेटी करण करण्याची मागणी मागील दोन दशकापासून केली जात असतांना याकडे जानिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे . तात्पुरती डागडूजी अन डांबरीकरण करून बोळवण केली जात असल्याने ह्या विभागाच्या अन् कंत्राटदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहेत .