पातूर नगर परिषद निवडणुकीत शिक्षकां चा सहभागाची चकौशी करा: हिदायतखान
पातूर (Patur Municipal Council Election) : नुकत्याच पार पडलेल्या पातूर नगर परिषद निवडणुकीत काही शासकीय व अनुदानित शाळांतील शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगराध्यक्ष हिदायत खान रुमखान यांनी केली आहे. राज्य शासनाच्या नियमांनुसार शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचारात किंवा राजकीय कामकाजात थेट सहभाग घेण्यास मनाई असताना काही शिक्षकांनी प्रचार, बैठका तसेच इतर राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष हिदायत खान रुमखान यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. नामांकन अर्ज भरण्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीत उपलब्ध सीसीटीव्ही आणि निवडणूक विभागाच्या चित्रीकरणाची तपासणी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, काही शैक्षणिक संस्थांच्या चालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांवर निवडणुकीत काम करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकरणांचीही चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे हिदायत खान रुमखान यांनी स्पष्ट केले. शिक्षकासह इतर कर्मचारीनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पुढे येऊन तक्रार करावी , असे आवाहनही त्यांनी केले आहे. संबंधित पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य माहिती शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घडामोडींमुळे पातूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून या प्रकरणात नेमके कोण दोषी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.