पारडा येथील दुहेरी खून प्रकरणाला फुटली वाचा; तिघे जेरबंद
करणीच्या संशयातून हत्या केल्याची आरोपींनी दिली कबुली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Parda Murder Case) : तालुक्यातील पारडा शेत शिवारातील आखाड्यावर राहणार्या वृद्ध पती-पत्नीची करणी करत असल्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली आहे. राहुल सम्राट खंदारे, अक्षय घनश्याम वाघमारे आणि राजु गौतम वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २९ जून रोजी अनिल बळीराम वाघमारे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांचे आई-वडील बळीराम देवबा वाघमारे व कलावती बळीराम वाघमारे हे पारडा शिवारातील आखाड्यावर असताना अज्ञात व्यक्तींनी धारदार हत्याराने हल्ला करून त्यांचा खून केला. या (Parda Murder Case) प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. मोहन भोसले व सपोनि व्ही.एस. अरसेवार यांच्या विशेष पथकाला तपासाचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ३ जुलै रोजी इसापुर येथील राहुल खंदारे (वय ३२), पारडा येथील अक्षय वाघमारे (वय ३०) आणि राजु वाघमारे (वय ३३) यांना ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
मुख्य आरोपी राजु वाघमारे याची प्रकृती वारंवार बिघडत होती. मयत बळीराम व कलावती वाघमारे करणी करत असल्याने आपली तब्येत बिघडत असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून त्याने साथीदार राहुल आणि अक्षय यांना सोबत घेऊन आखाड्यावर जाऊन दोघा वृद्धांची हत्या केली. (Parda Murder Case) ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सपोनि व्ही.एस. अरसेवार, पोउपनि माधव जिव्हारे यांच्यासह पांडुरंग राठोड, गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, निरंजन नलवार, सतिश जाधव, नरेंद्र साळवे, दत्ता नागरे, प्रदिप झुंगरे, इरफान पठाण, मारोती काकडे यांच्या पथकाने केली. गुन्हा उघड करणार्या पथकाचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.