परभणीत नीट पेपरफुटीप्रकरणी पाथरी बंदला प्रतिसाद!
जंतर मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने; बँका, दवाखाने, शाळा व बससेवा नियमित
परभणी (Pathri Bandh) : पाथरी तालुक्यात दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच आंदोलकांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार २३ जुलै रोजी पाथरी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासूनच बहुतांश दुकाने बंद ठेवली. मात्र बँका, दवाखाने, मेडिकल दुकाने, शाळा तसेच बससेवा अत्याश्यक सुविधा सुरू होत्या .
वंचित बहुजन आघाडी, माकप आणि शिवसेना (उबाठा) यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी १२ वा सुमारास शहरातून रॅली काढून तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थी व युवकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये जंतर मंतर येथील लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करावी तसेच आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.