परभणीतील पाथरीत रातोरात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना
आ. सईद खान यांचा पुढाकार खा . जाधव यांच्या उपस्थितीत अनावरण पाथरीतील घटनाक्रमाची परभणी जिल्हाभर चर्चा
परभणी (Chhatrapati Shivaji Maharaj) : पाथरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रशासनाची अंतिम परवानगी मिळण्यापूर्वीच रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून विधान परिषदेचे नवनिर्माचित आमदार सईद खान यांनी हा पुतळा उभारला आहे . विशेष म्हणजे सकाळी खा . संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आ .सईद खान यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जाहीर अनावरण केले . दरम्यान पाथरीत नियोजीत चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन झाल्याची सकाळी बातमी समाज माध्यमांतुन वाऱ्यासारखी व्हायरल होताच शिवप्रेमींनी चौकाकडे धाव घेतली होती.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ व ५४८ ब यांच्या टी पॉईंटवरील या ठिकाणी (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी मागील ४० वर्षांपासून स्थानिकांची इच्छा होती. अनेक वर्षांपासून येथे नियोजित पुतळा स्थळ असा फलक लावण्यात आला होता. आमदार सईद खान यांनी याच ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारण्याचा संकल्प करत सहा महिन्यांपूर्वी आकर्षक चबुतरा व संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले होते. पुतळाही तयार होता मात्र काही परवानग्या प्रलंबित असल्याने तो बसविणे रखडले होते.
दरम्यान विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याशिवाय शपथ घेणार नाही असा निर्धार नवनिर्वाचित आ . सईद खान यांनी केला होता. अखेर रविवार २८ जुन रोजी पहाटे रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून पुतळा शहरात आणण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने नियोजित चबुतऱ्यावर पुतळा बसविण्यात आला. मोजक्या विश्वासू सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पुतळा उभारण्यात आला.प्रशासनाला मात्र या संदर्भात भनकही लागू देण्यात आली नाही हे विशेष.
दुपारी अनावरण, चौक परिसर शिवमय...
सकाळी सुमारे पावणे बारा वाजता परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सईद खान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ढोल ताशे, वाद्यवृंद, फटाक्यांची आतषबाजी आणि जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराला फुलांनी सुशोभित करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष आसेफ खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, शिवसेना शहरप्रमुख लालू खान, नाना टाकळकर, एकनाथ शिंदे, बालाजी कुराडे, प्रल्हादराव चिंचाणे, नगरसेवक अमोल भालेपाटील, गोविंद हरकळ, वैजनाथ कोल्हे, विक्रम गायकवाड, संतोष गलबे, उदय भिसे, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक तसेच शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.
शिवरायांचा पुतळा बसवल्याशिवाय विधानपरिषद ची शपथ घेणार नव्हतो
या ठिकाणी (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनातून परवानगी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा पुतळा स्वखर्चाने उभारण्यात आला आहे. मी मनाशी ठरवले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याशिवाय विधान परिषद सदस्य पदाची शपथ घेणार नाही. आज ते स्वप्न पूर्ण झाले. -आमदार सईद खान
सईद खान यांनी पाथरीकरांचे चार दशकांचे स्वप्न पूर्ण केले...
महामार्गाचे काम सुरू असताना या ठिकाणी पुतळ्यासाठी जागा आरक्षित करणाऱ्यांचे अभिनंदन करतो. अनेक वर्षांपासून पाथरीकरांची इच्छा होती की, या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. आमदार सईद खान यांनी ते स्वप्न पूर्ण केले आहे. काही कामे जात पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन करावी लागतात. आ .सईद खान हे शिवरायांचे मुस्लीम मावळे आहेत . पाथरीकरांमध्ये आज आनंदाचे वातावरण आहे. - खा. संजय जाधव