Parbhani Security Guard: सुरक्षा रक्षक भरतीत माजी

परभणीत ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदी निवड

Parbhani Security Guard

माजी विद्यार्थी, परिसरातील उमेदवारांना प्राधान्य; निवड झालेल्यांना नियुक्ती आदेश 

परभणी (Parbhani Security Guard) : राणीसावरगाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस.एस.सिक्युरिटी डिपार्टमेंट प्रा.लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक भरतीत माजी विद्यार्थी व परिसरातील ९८ उमेदवारांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत चार दिवसीय कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव  कृष्णा दळणर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेणुकादास बोन्नर होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस. सिक्युरिटी डिपार्टमेंट प्रा. लि.चे चेअरमन डॉ.अमोल सिंगनाथ उपस्थित होते. यावेळी सुरक्षा रक्षक महेशकुमार सरतापे, दिग्विजय मोहिते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी शिंदे, प्रा. डॉ. अंगद गडमे, प्रा. अभय पाटील आदींची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व संस्थेचे प्राचार्य शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अमोल सिंगनाथ म्हणाले की, सुरक्षा रक्षक पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले असून, आयएसओ मानांकन प्राप्त कंपनीमध्ये उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. निवड झालेल्या ९८ उमेदवारांना नियमांनुसार विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीमध्ये महाविद्यालयातील माजी विद्यार्थी तसेच परिसरातील उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम बोबडे यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.नरसिंगदास अभंग यांनी मानले. 

कंपनीमार्फत नियुक्ती झालेल्या उमेदवारांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधा, विधवा पेन्शन यांसह विविध शासकीय व कंपनीच्या नियमानुसार सुविधा मिळणार आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या भरतीचे आयोजन करण्यात येईल. -कृष्णा दळणर, सचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था राणीसावरगाव.