Parbhani Poor Road: शहरातील नवा मोंढा परिसरातून कृ

परभणीतील मुख्य रस्त्यावर चिखल, खड्ड्यांचे साम्राज्य

Parbhani Poor Road

पाकीजा नगर - रामजी आंबेडकर नगर मार्गाची दुरावस्था नागरिक, व्यापार्‍यांचा मनपाविरोधात संताप...!

परभणी (Parbhani Poor Road) : शहरातील नवा मोंढा परिसरातून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा तसेच पाकीजा नगर, रामजी आंबेडकर नगर, जिंतूर रोड आणि गव्हाणे चौक यांना जोडणारा मुख्य रस्ता सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, तर पादचार्‍यांचीही मोठी गैरसोय होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याचे गेल्या दहा वर्षांपासून पक्के बांधकाम करण्यात आलेले नाही. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. कायमस्वरूपी दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा रस्ता कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने जिल्यातील अनेक शेतकरी, व्यापारी, हमाल, मालवाहू वाहने तसेच मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅक्टर, चारचाकी, दुचाकी, हातगाड्या आणि बैलगाड्यांची दिवसभर वर्दळ असते. रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे वाहतुकीचा वेग मंदावून अपघाताचा धोका वाढला आहे.

स्थानिक व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, खराब रस्त्यामुळे ग्राहकांनाही ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून व्यवसायावरही परिणाम होत आहे. परिसरातील रहिवाशांनाही रोजच्या दैनंदिन कामासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि वाहनचालकांनी 'देशोन्नती'च्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत संबंधित लोकप्रतिनिधी आणि (Parbhani Poor Road) महापालिका प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, रस्त्याचे पक्के काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या या रस्त्याची एवढी दुरवस्था झाल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळा संपण्याची वाट न पाहता तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.