परभणीत रोहीला दुचाकीची धडक; मजुराचा मृत्यू...!
बोरी-वालूर रोडवरील नागठाणा पाटी जवळ सोमवारी सकाळी अपघात..!
परभणी (Parbhani Laborer Death) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील आठवडी बाजारात मजुरीच्या कामासाठी जात असलेल्या एका मजुराच्या दुचाकीची रोही ला धडक बसली. यामध्ये मजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवार १३ जुलै रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास बोरी - वालूर रोडवरील नागठाणा पाटी जवळ घडला. या (Parbhani Laborer Death) अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, बबन सखाराम भुमरे वय ५५ वर्ष, रा. कान्हड ता. सेलू असे मयताचे नाव आहे. संबंधित व्यक्ती हा मजुरीच्या कामासाठी आठवडी बाजाराकडे येत होता. नागठाणा पाटीजवळ अचानक रोही समोर आल्याने दुचाकीची धडक होऊन अपघात झाला. यामध्ये बबन भुमरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीसमोर अचानक रोही आल्याने भुमरे यांचे दुचाकीवरील नियत्रण सुटले. ते रोडवरजोरात कोसळले.
परिसरातील नागरीकांनी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. बबन भुमरे हे मोजमजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे. मयताच्या कुटूंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.घटनास्थळाला बोरी पोलिसांनी भेट दिली असून नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.