परभणीच्या ताडकळसमध्ये डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा...!
खरीप मशागतीच्या कामांमुळे शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर गर्दी
परभणी (Parbhani diesel shortage) : पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगात सुरू असताना ताडकळस येथे डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहनधारक व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गुरुवारी सकाळी पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळताच पेट्रोल पंपावर तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. ग्रामीण भागात नांगरणी, वखरणी, रोटर, सरी मारणे आदी कामे सुरू असल्याने डिझेलची मागणी वाढली आहे.
मात्र पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अनेक पेट्रोल पंपांवर (Parbhani diesel shortage) ‘नो स्टॉक’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. ताडकळस येथील पेट्रोल पंपावर एक दिवसाआड डिझेल व पेट्रोलचा मर्यादित साठा उपलब्ध होत असून प्रशासनासाठी राखीव साठाही ठेवावा लागत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासूनच वाहनधारक व शेतकरी वाहनांसह रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.