परभणीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १८ संचालकासाठी १९ जुलैला मतदान...!
निवडणूक कार्यक्रम जाहीर; आजपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरु
परभणी (Parbhani Bank Election) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी च्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर येथील अ. सुरेश पी. काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ अ नुसार ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार, १० जून रोजी निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर १७ जून ते २४ जून या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. २४ जून रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, तर २५ जून ते ९ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. या निवडणुकीत १८ संचालक पदांसाठी मतदान होणार आहे.
यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा संस्था मतदारसंघातून १४ जागा, महिला राखीव मतदारसंघासाठी २ जागा, इतर मागास प्रवर्गासाठी १ जागा आणि भटक्या विमुक्त जाती/जमातीसाठी १ जागा राखीव आहे. तसेच (Parbhani Bank Election) अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ, शेतमजूर प्रतिनिधी आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधींसाठीही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. १९ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या (Parbhani Bank Election) निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व मिळवण्यासाठी विविध गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी १७ जूनपासून कार्यालयीन वेळेत विभागीय सहनिबंधक कार्यालयातून नामनिर्देशन अर्ज उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अ. सुरेश पी. काकडे यांनी केले आहे.