Dharmendra Pradhan resigns: NEET-UG 2026 आणि इतर स

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने संतुक पिंपरीमध्ये जल्लोष, अभिजीत दिपकेंच्या लढ्याला यश

Dharmendra Pradhan resigns

हिंगोली (Dharmendra Pradhan resigns) : NEET-UG 2026 आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राजीनामा दिला. या निर्णयानंतर हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या गावात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. संतुक पिंपरी हे सामाजिक कार्यकर्ते आणि CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे जन्मगाव आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात NEET, CUET, SSC सारख्या परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपर लीकच्या घटनांमुळे विद्यार्थी संतप्त होते. या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी अभिजीत दिपके यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. जंतर-मंतरवर “Happy Birthday Pradhan, Please Resign” अशा अनोख्या पद्धतीने आंदोलन करून त्यांनी देशाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले होते.

आज राजीनाम्याची बातमी येताच संतुक पिंपरी गावात आनंदाला पारावार उरला नाही. गावातील तरुणांनी फटाके फोडले, गुलाल उधळला आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. तरुणांचा दिसणारा उत्साह हाच या जल्लोषाचा प्रत्यय आहे. “विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश मिळाले” अशा घोषणा देत गावकऱ्यांनी अभिजीत दिपकेंच्या कार्याचे कौतुक केले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, “आमच्या गावच्या मातीत जन्मलेल्या अभिजीतने दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवला. लाखो विद्यार्थ्यांसाठी त्याने जे केलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

धर्मेंद्र प्रधान यांनी 2021 पासून शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  विद्यार्थी संघटनांनी मात्र ही फक्त सुरुवात असल्याचे म्हणत NTA रद्द करणे आणि परीक्षा व्यवस्थेत पूर्ण पारदर्शकता आणण्याची मागणी पुन्हा केली आहे. संतुक पिंपरीच्या मातीतून उठलेल्या एका आवाजाने संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्थेला हलवले आणि त्याचा परिणाम म्हणून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे संपूर्ण गावात अभिमान, आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे.