परभणीत पनवेल येथील प्रॉपर्टी विक्रीत साडे चौदा कोटी रुपयांची फसवणूक
मुंबई येथील चौघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी (Panvel Property Fraud) : गंगाखेड येथे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेल्या कोळखे येथील प्रॉपर्टी विक्रीच्या नावाखाली साडे चौदा कोटी रुपये घेऊन सुद्धा खरेदी खत व फेरफार न करून देत विश्वासघात करणाऱ्या मुंबई येथील चौघांविरुद्ध शनिवार २५ जुलै रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथील टोटल लॉजीस्टीक (इंडिया) प्रा.लि. या कंपनीच्या मालकीची कोळखे ता. पनवेल जि. रायगड शिवारात गट क्रमांक ८१, ८२ व ८३ मध्ये असलेली प्रॉपर्टी विक्रीसाठी प्रविण गुप्ता यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांच्या निवासस्थानी महादेव जानकर, महादेव मुंडे, विशाल बुधवंत व राजेश रंजित यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकूण प्रॉपर्टीपैकी दोन हिस्से महादेव जानकर व राजेभाऊ फड यांना विक्री करण्याचे ठरविले.
या (Panvel Property Fraud) प्रॉपर्टी विक्रीच्या नावाखाली राजेभाऊ फड यांच्याकडून १५ जानेवारी २०२५ ते २१ एप्रिल २०२५ दरम्यान प्रविण गुप्ता व त्यांच्या कुटुंबाने मुंबई येथे तसेच आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या फार्म हाऊसवर आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, निळोबा मुंढे, अक्षय मुंढे व अन्य लोकांच्या समक्ष वेळोवेळी रोख आणि आरटीजीएसच्या माध्यमातून १४ कोटी ४९ लाख ८५ हजार ९७५ रुपये स्विकारून ५० टक्के ४९ गुंठे एवढा हिस्सा (पाच वेअर हाऊस व एक साडी शॉप बांधकाम व मोकळी जागा) १५ कोटी रुपयात देण्याचे ठरवून तसा ठराव करून तब्बल साडे चौदा कोटी रुपये घेऊन सुद्धा गुप्ता कुटुंबाने या प्रॉपर्टीचे खरेदी खत किंवा फेरफार करून दिले नाही.
टाळाटाळ केल्याने राजेभाऊ फड यांनी खरेदी खत करून देण्याबाबत विनंती केली असता प्रविण गुप्ता यांनी दमदाटी करून फोनवर परत कॉल केला अथवा माझ्याकडे आला तर तुला सोडणार नाही तुझा जिव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नकोस आपला व्यवहार विसरून जा अन्यथा तुझा खून होईल अशी धमकी दिल्याची फिर्याद राजेभाऊ श्रीराम फड वय ४८ वर्ष रा. बनपिंपळा ता. गंगाखेड यांनी शनिवार २५ जुलै रोजी गंगाखेड पोलीस दिल्यावरून रात्री उशिराने टोटल लॉजीस्टीक (इंडिया) प्रा.लि. कंपनीचे संचालक प्रविण गुप्ता, त्यांची पत्नी मंजू गुप्ता, मुलगा अंकित गुप्ता व सून संजना गुप्ता सर्व रा. मुंबई यांच्याविरुद्ध प्रॉपर्टी विक्रीचा करार करून १४ कोटी ४९ लाख ८५ हजार ९७५ रुपये स्विकारून सुद्धा खरेदी खत किंवा फेरफार न करून देता विश्वासघात करत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे हे करीत आहेत.