नवी मुंबईतील पनवेल परिसरात असलेल्या JW पडेंगर कस्

नवी मुंबई पनवेलमधील कस्टम्स गोदामाला भीषण आग, मोठे आर्थिक नुकसान

नवी मुंबई (Panvel Fire) : JNPT परिसरातील केमिकल प्लांटमध्ये स्फोटांची मालिका; भीषण आगीमुळे खळबळ

नवी मुंबई : नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) परिसरातील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण स्फोटांची मालिका घडत मोठी आग लागल्याची गंभीर घटना घडली. संबंधित लॉजिस्टिक पार्कमधील एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, केमिकल प्लांटमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर आगीने क्षणात विक्राळ रूप धारण केले. यानंतर लागोपाठ आणखी दोन स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटांचे आवाज दूरवर ऐकू गेल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. कामगारांनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे.

या भीषण आगीमुळे आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट उसळले असून ते अनेक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत. आगीचे स्वरूप लक्षात घेता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. आग लागलेला परिसर डोंगराळ भागालगत असल्याने ज्वाळा त्या दिशेने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच शेजारील इतर केमिकल कंपन्यांनाही या आगीचा धोका निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आणखी मदत पाठवण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने असल्याने आग नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरत आहे.

या घटनेत नेमके किती जण अडकले आहेत किंवा जखमी झाले आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तरीही आगीच्या तीव्रतेमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण आणि प्लांटमध्ये साठवलेली रसायने कोणती होती, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. सलग स्फोटांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.