पालघरला पुन्हा भूकंपाचा धक्का; डहाणू-तलासरी परिसरात 3.5 रिश्टर तीव्रतेचे हादरे
दुपारी 4.47 वाजता जमिनीला कंप; नागरिक घराबाहेर, जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची नोंद नाही
पालघर : पालघर जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुपारी 4 वाजून 47 मिनिटांच्या सुमारास जमिनीला अचानक कंप जाणवू लागल्याने अनेकांनी तत्काळ सुरक्षिततेचा उपाय म्हणून घराबाहेर धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता 3.5 इतकी नोंदवण्यात आली. डहाणू आणि तलासरी परिसरात या भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले. काही सेकंद जाणवलेल्या या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक नागरिक घरांमधून बाहेर पडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.
सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.