प्रा. डॉ. कैलाश भांडारकर यांचे निधन;आज बुधवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यविधी
गडचिरोली (Obituary News) : गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय मधील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलाश भांडारकर यांचे आज, बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री त्यांच्या छातीत हलक्या वेदना जाणवत होत्या. मात्र मस्क्युलर पेन समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दररोजच्या दिनक्रमाप्रमाणे ते आज सकाळी मॉर्निंग वॉकलाही गेले होते. त्यानंतर घरी परतल्यावर छातीत वेदना वाढल्याने त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.
डॉ. भांडारकर हे प्रभावी वक्ते, सतत हसतमुख राहणारे आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. मित्रपरिवारातही त्यांचा मोठा गोतावळा होता. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी सायंकाळी ६.०० वाजता कठानी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.