Nilanga Court Verdict: येथील अतिरिक्त सत्र न्यायाल

शेत रस्त्याच्या वादातून खून प्रकरणात एकास जन्मठेप

Nilanga Court Verdict

निलंगा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पुरावा नष्ट करण्याचाही गुन्हा सिद्ध!

लातूर (Nilanga Court Verdict) : शेतातील ये-जा करण्याच्या रस्त्याच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीचा निर्घृण खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निलंगा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २४९/२०२३ मधील आरोपी संभाजी गोविंद घोटाळे, (रा. तळीखेड, ता. निलंगा) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. पवार यांनी दिनांक १७ जून २०२६ रोजी भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये जन्मठेप व २० हजार रुपये दंड, तसेच कलम २०१ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्यायालयाने दंडाची संपूर्ण रक्कम मयताच्या वारसांना देण्याचेही आदेश दिले आहेत.  या (Nilanga Court Verdict) प्रकरणात फिर्यादी लक्ष्मण चंदर घोटाळे यांनी दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तळीखेड शेतशिवारात आरोपी संभाजी घोटाळे याने मयत भरत चंदर घोटाळे यांच्याशी शेतातील येण्या-जाण्याच्या वाटेच्या कारणावरून वाद घालून त्यांच्यावर काठीने मारहाण केली व गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतातील आखाड्यावर जनावरांच्या गोठ्याजवळ नेऊन ठेवला. घटनेची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. के. सुरवसे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल तसेच आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा केलेला प्रयत्न याबाबत ठोस पुरावे संकलित करण्यात आले. त्याआधारे मूळ गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम २०१ ची वाढ करून दोषारोपपत्र मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा येथे दाखल करण्यात आले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीने गुन्हा नाकारला असला तरी सरकार पक्षाने सादर केलेले ठोस व सुसंगत पुरावे निर्णायक ठरले. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. विशेषतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीमुळे आरोपीविरुद्धचे आरोप भक्कमपणे सिद्ध झाले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. कपिल व्ही. पंढरीकर यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीचा गुन्हा न्यायालयासमोर सिद्ध केला. त्यांच्या युक्तिवादासह तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांची साखळी ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले. सदर प्रकरणात तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. के. सुरवसे, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. अभिषेक शिंदे, कोर्ट समन्वय अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सदानंद वाघमारे, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार एस. के. बुलबुले तसेच कार्यालयीन कर्मचारी एच. जी. बिरादार यांनी विशेष परिश्रम घेतले.