NEET student suicide: १८ वर्षीय विद्यार्थ्याने नीट

नीट परीक्षेच्या तनावामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

NEET student suicide

हिंगोली आत्महत्येपूर्वी व्हिडीओ करून विहिरीत उडी मारून संपविले जीवन

हिंगोली (NEET student suicide) : शहरातील अष्टविनायक नगरातील एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने नीट परीक्षेच्या तनावातून विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने मम्मी मला माफ कर, माझा तान घेऊ नको, मी पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्माला येणार आहे. भावासोबत चांगली रहा, असा व्हिडीओ केला होता.  या बाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील अष्टविनायक नगरातील सुशिल विलास ढगे (१८) या विद्यार्थ्याने १० वी परीक्षेत ९२ तर १२ वी परीक्षेत ६२ टक्के गुण मिळविले होते. त्याने नीट परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. घरच्या लोकांनीही त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. याच महिन्यात सुशिलने नीटची परीक्षा दिली होती. परंतु त्याचा पेपर कठीण गेल्यामुळे तो काही दिवसापासून बेचैन होता. तरी देखील त्याला नीट परीक्षेत चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती. २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास त्याने घरात कोणालाही न सांगता बाहेर गेला. बराचवेळ होऊन सुध्दा तो घरी आला नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती.

सुशिलने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मम्मी मला माफ कर, माझा तान घेऊ नको, मी पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्माला येणार आहे. भावासोबत चांगली रहा, मला काही समजत नाही, मी आत्महत्या करीत आहे, असा व्हिडीओ केला होता. हा व्हिडीओ पाहील्यानंतर कुटूंबातील सारेचजन घाबरले होते. २४ जून बुधवार रोजी शोध मोहीम सुरू केली असता अष्टविनायक नगरातील एका विहिरीमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळताच कुटूंबीयांनी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत सुशिल याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे.