सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षा

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप; सच्चिदानंद सिंह यांची वकिलामार्फत नोटीस

NCP Internal Conflict

अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; प्रफुल पटेल म्हणाले, ‘नोटीसशी माझा कोणताही संबंध नाही’

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील पदाधिकारी सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतल्याने पक्षांतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. सिंह यांनी 9 जुलै रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या नोटीसला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, आता सच्चिदानंद सिंह यांनी ही निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नसल्याचा दावा करत अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रफुल पटेल यांनी काय सांगितले?

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रफुल पटेल यांनी नोटीसशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसारच झाली असून, या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नसल्याचे सांगितले.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी पक्षांतर्गत काही सुधारणा आवश्यक असल्याचे मत आपण नोटीस येण्यापूर्वीच अनौपचारिक चर्चेत व्यक्त केले होते, असेही पटेल यांनी स्पष्ट केले. मात्र, त्या वैयक्तिक मताचा आणि सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोण आहेत सच्चिदानंद सिंह?

सच्चिदानंद सिंह हे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष असून, गेल्या 15 वर्षांपासून पक्षासोबत जोडलेले आहेत. अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना डिसेंबर 2023 मध्ये कर्जत येथे सिंह यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, 26 फेब्रुवारी 2026 रोजी तयार करण्यात आलेल्या कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

नेमका वाद काय?

सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवून त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड पक्षाच्या घटनेनुसार नसल्याचा आक्षेप नोंदवला आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस स्वतःच्या निर्णयाने पाठवली की त्यामागे अन्य कोणाचा सहभाग आहे, याचाही शोध घेतला जाईल, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने घेतली आहे. आता पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

यापूर्वी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असा अंतर्गत कलह पाहायला मिळाल्याची चर्चा होती. त्यामुळे सध्याचा अध्यक्षपदाचा वाद हा त्याच संघर्षाचा पुढील टप्पा आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

निवडणूक आयोगासोबतच्या पत्रव्यवहारावरही संभ्रम

फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. त्या पत्रात प्रफुल पटेल यांचा उल्लेख केवळ राज्यसभेचे गटनेते, तर सुनील तटकरे यांचा उल्लेख लोकसभेचे गटनेते म्हणून करण्यात आला होता.

या घडामोडीला चार महिने उलटूनही दोन्ही नेत्यांच्या पदांबाबत निर्माण झालेला संभ्रम पक्षाने अद्याप स्पष्ट केलेला नाही. तसेच निवडणूक आयोगाला नव्याने कोणता पत्रव्यवहार करण्यात आला आहे की नाही, याबाबतही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर घेण्यात आलेल्या आक्षेपामागे वरिष्ठ पातळीवरील कोणत्या नेत्याचा सहभाग आहे का, याचा शोध राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.