डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मागणीला यश
पुढील डीपीडीसी बैठकीत पत्रकारांना प्रवेश देण्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचे आश्वासन
नांदेड (Editor Journalist Association) : जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) बैठकीत पत्रकारांना प्रवेश देण्यात यावा तसेच बैठकीचे थेट प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालयाच्या (DIO) अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात यावे, याअशी मागणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून करण्यात आली होती. महत्त्वपूर्ण मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.पालकमंत्री अतुल सावे यांनी पत्रकारांच्या मागणीला गांभीर्याने घेत पुढील बैठकीत पत्रकारांना डीपीडीसी बैठकीत प्रवेश देण्याचे आश्वासन दिले आहे. पत्रकारांनी (Editor Journalist Association) दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होत असून विकासकामांचे नियोजन, प्राधान्यक्रम निश्चिती आणि निधी वाटपाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांची माहिती पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले. यासोबतच, लोकसभा आणि विधानसभेच्या कामकाजाप्रमाणेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. यामुळे नागरिकांना विकासकामांबाबतची माहिती थेट पाहता येईल आणि शासनाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता निर्माण होईल, असे पत्रकारांनी नमूद केले. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यताप्राप्त पत्रकारांना प्रवेश देण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच पत्रकारांनी मांडलेल्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या आश्वासनामुळे नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता निर्माण होण्यास आणि जनतेपर्यंत विकासकामांची अचूक व विश्वासार्ह माहिती पोहोचण्यास याचा मोठा हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आली. हे निवेदन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनाच्या मराठवाडा अध्यक्ष प्रवीण खंदारे आणि यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सर्व संघटनांचे जेष्ठ पत्रकार अभय कुळजगाइकर, विजय निलंगेकर, राजकुमार कोटलवार, कुवरचंद मंडले, प्रमोद चौधरी, DMEJ जिल्हा सचिव प्रवीणकुमार देशमुख, यशपाल भोसले, गजानन देशमुख, अर्जुन राठोड,संघरत्न पवार, नकुल जैन, शिवाजी हंबर्डे, पवन जगडमवार, भैय्यासाहेब गोडबोले, मनोज मनपुरे, मदनपाल बनसोडे, श्रीराम मोटरगे, धनंजय कुलकर्णी, शेख रफिक, किरण कांबळे,अशोक झलारे, अविनाश परघणे आदी जिल्हाभरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.