कर्तव्यावर असताना हल्ल्यात मृत्यू झालेल्या तलाठ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत मंजूर
हिंगोली (Talathi death case) : कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झालेल्या महसूल कर्मचार्याच्या कुटुंबाला राज्य सरकारने विशेष बाब म्हणून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन आदेश जारी केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रांजे सज्जातील ग्राम महसूल अधिकारी कै. संतोष देवराव पवार हे २८ ऑगस्ट २०२४ रोजी शासकीय कामकाज करत असताना कार्यालयातच झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. पवार हे वसमत तहसील कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत होते. या (Talathi death case) घटनेनंतर हिंगोलीच्या तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी पवार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव ५ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाकडे सादर केला होता. कर्तव्यावर असताना झालेल्या हल्ल्यात प्राण गेल्याने कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी शिफारस त्यात करण्यात आली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर आज त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. शासनाने कै. संतोष देवराव पवार यांच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसाला ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य म्हणून प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. शासनाच्या महसूल विभागाचे सहसचिव संजय र. बनकर यांनी हे आदेश निर्गमित केले आहे .
काय होते ते प्रकरण आडगाव रंजेबुवा तलाठी सज्जा कार्यालयात तलाठी संतोष पवार हे २८ ऑगस्ट २०२४ बुधवार रोजी कार्यालयीन कामकाज करीत असताना दुपारी १२.३० च्या सुमारास एका व्यक्तीने कार्यालयात येऊन तलाठी संतोष पवार यांच्यासोबत शाब्दीक बाचाबाची करून सोबत आणलेल्या मिरचीची पूड त्यांच्या डोळ्यात टाकून धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळा वरून पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यातील तलाठी पवार यांना दिलीप चव्हाण यांच्या वाहनातून परभणी रूग्णालयात नेत असताना तलाठी पवार यांचा रस्त्यामध्ये मृत्यू झाला होता. तलाठी संतोष देवराव पवार यांच्या अंगावर मिरची पूड टाकून चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी हट्टा पोलिसात तलाठी बालाजी डवरे यांनी २८ ऑगस्ट रोजी फिर्याद दिल्याने प्रताप जगन्नाथ कर्हाळे रा.बोरी सावंत याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तलाठी संघातर्फे अनेक मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मयत तलाठी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना तात्काळ एक रकमी ५० लाख रूपयाची मदत त्वरीत जाहीर करावी, भविष्यात त्यांच्या कुटुंबियाच्या उदर निर्वाहासाठी त्यांच्या वारसांना तात्काळ अनुकंपावर शासकीय सेवेत समाविष्ट करून द्यावे अशा अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या.