'महाराष्ट्राला बदनाम करू नका'; मिसिंग लिंकवर टीकाकारांना मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर
18 तासांत वाहतूक सुरळीत केल्याचा दावा; मिसिंग लिंकला 'इंजिनिअरिंग मार्व्हल' म्हणत भविष्यातील उपाययोजनांची माहिती
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर झालेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. काही लोकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारवर आरोप केले, मात्र अवघ्या 18 तासांत मिसिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मिसिंग लिंक प्रकल्पावरून सरकारला लक्ष्य करणाऱ्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भविष्यात या प्रकल्पावर टीका करणारे लोक कदाचित राहणार नाहीत, मात्र दहा वर्षांनंतरही मिसिंग लिंक अस्तित्वात असेल आणि त्यावेळी या प्रकल्पाशी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नाव जोडले जाईल. "माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका," असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभेतील भाषणात फडणवीस यांनी सोशल मीडियावरून टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला. काही जण पैसे घेऊन मिसिंग लिंकबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरड कोसळण्याच्या घटनेतून काही महत्त्वाचे धडे मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पाण्याचा प्रवाह, डोंगरातील बदल आणि दरडी कोसळण्याची शक्यता यांचा अभ्यास करून पुढील काळात उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी आयआयटीमधील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारच्या काळात धाडसी निर्णय घेतल्यामुळेच मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण होऊ शकला, असा दावा फडणवीस यांनी केला. त्यांनी कोकण रेल्वेचे उदाहरण देत सांगितले की, सुरुवातीला या प्रकल्पाबाबतही अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र मधू दंडवते यांनी पुढाकार घेऊन कोकण रेल्वे सुरू केली. त्यानंतर अनेक वर्षे पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या, पण प्रत्येक वेळी सुधारणा करत प्रकल्प पुढे नेण्यात आला.
मिसिंग लिंकचा प्रस्ताव याआधीच्या आघाडी सरकारच्या काळात तयार झाला होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दोन पानी पत्र लिहून 14 कारणे देत हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगितले आणि फाईल बंद केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आणि सरकारने तो पूर्ण केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मिसिंग लिंक हा केवळ रस्ता नसून अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठी कामगिरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा भारतातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रीज आणि जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ताशी 170 किलोमीटर वेगाने वारे वाहणाऱ्या परिसरात हा प्रकल्प उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरड कोसळण्याच्या घटनेबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की, वरून आलेला मातीचा आणि दगडांचा ढिगारा बोगद्याच्या कमानीवर पडला होता. त्यामुळे बोगद्याच्या संरचनेला मोठे नुकसान झाले नाही. प्रवाशांनी इमर्जन्सी बटण दाबल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत मदत पोहोचली. बोगदा असल्यामुळेच आपला बचाव झाल्याचे काही प्रवाशांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.
घटनेनंतर काही जणांनी पाणी झिरपत असल्याचे व्हिडीओ दाखवत प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प वाया गेल्याचा आरोप केला. मात्र, या सर्व टीकेला उत्तर देत केवळ 18 तासांत मिसिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.