रेल्वे विकासाला वेग देण्यासाठी दिल्लीत मोठी हालचाल
खासदार संजय देशमुख व राज्यसभा खासदार डॉ. रामराव वडकुते यांची रेल्वे बोर्ड अध्यक्षांसोबत निर्णायक बैठक
हिंगोली (Hingoli Railway Development) : यवतमाळ–वाशीम लोकसभा मतदारसंघ तसेच हिंगोलीसह संपूर्ण विदर्भ–मराठवाडा प्रदेशातील रेल्वे विकासाला गती देण्यासाठी खासदार संजय देशमुख व राज्यसभा खासदार डॉ. रामराव वडकुते यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री. सतीश कुमार यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्प, नवीन रेल्वे सेवा व प्रवासी सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वे विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन रेल्वे बोर्ड अध्यक्षांना सादर करण्यात आले.
खासदार संजय देशमुख यांनी सांगितले की, विदर्भ व मराठवाडा या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आजही अपुरी असून औद्योगिक, शैक्षणिक, व्यापारी व सामाजिक विकासासाठी नवीन रेल्वे सेवा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने त्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या रेल्वे बोर्डासमोर मांडल्या.
यामध्ये (Hingoli Railway Development) नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (अकोला मार्गे) सुरू करून वाशीम व अकोला येथे अधिकृत थांबा देणे, नांदेड–छत्रपती संभाजीनगर/मनमाडपर्यंत वाशीम–अकोला मार्गे दररोज इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे, जनशताब्दी एक्सप्रेस (12071/12072) हिंगोलीहून वाशीमपर्यंत विस्तार करणे, वर्धा–नांदेड रेल्वे मार्गाचे काम गतीने पूर्ण करणे, मूर्तिजापूर–दारव्हा (यवतमाळ) रेल्वे मार्गाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देऊन मंजुरी देणे, वाशीम–बडनेरा रेल्वे मार्गास मंजुरी व निधी उपलब्ध करून देणे तसेच वाशीम–दिग्रस–माहूर–आदिलाबाद या नव्या रेल्वे मार्गास मंजुरी देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
तसेच नांदेड–कुर्ला रेल्वे गाडी क्रमांक 17665/17666 व 17667/17668 सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करत या गाडीच्या वेळापत्रकात प्रवाशांना सोयीस्कर बदल करणे व कायमस्वरूपी रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच नागपूर–कोल्हापूर (11403/11404) ही रेल्वे सेवा आठवड्यातून दोन दिवसांऐवजी दररोज सुरू करावी, नांदेड–नागपूर दरम्यान दैनंदिन पॅसेंजर रेल्वे सुरू करावी तसेच नांदेड–पुणे (वाशीम–अकोला मार्गे) नवीन दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी राज्यसभा खासदार डॉ. रामराव वडकुते यांनी सांगितले की, विदर्भ–मराठवाड्याचा रेल्वे विकास हा केवळ वाहतुकीचा विषय नसून या प्रदेशाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, कृषी व सामाजिक प्रगतीचा पाया आहे. या भागातील नागरिकांना आजही अनेक महत्त्वाच्या शहरांशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन रेल्वे सेवा, प्रलंबित रेल्वे मार्गांची मंजुरी आणि सुरू असलेल्या कामांना गती देणे ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, नांदेड–पुणे नवीन रेल्वे सेवा, नांदेड–नागपूर दैनंदिन पॅसेंजर, जनशताब्दी एक्सप्रेसचा वाशीमपर्यंत विस्तार, वर्धा–नांदेड रेल्वे मार्ग, मूर्तिजापूर–दारव्हा, वाशीम–बडनेरा तसेच वाशीम–दिग्रस–माहूर–आदिलाबाद हे रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भ व मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढतील. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा लाभ होईल.
डॉ. वडकुते यांनी पुढे सांगितले की, नांदेड–कुर्ला रेल्वेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करून कायमस्वरूपी रॅक उपलब्ध करणे तसेच नागपूर–कोल्हापूर रेल्वे सेवा दररोज सुरू करणे या मागण्याही तितक्याच महत्त्वाच्या असून या सर्व विषयांवर रेल्वे बोर्डासमोर सविस्तर व ठोस भूमिका मांडण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य म्हणून या सर्व मागण्यांच्या मंजुरीसाठी व अंमलबजावणीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी दोन्ही खासदारांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही खासदारांनी व्यक्त केलेला विश्वास असा की, या सर्व मागण्यांची लवकर पूर्तता झाल्यास हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशीम, अकोला तसेच संपूर्ण विदर्भ–मराठवाड्यातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती प्राप्त होईल.