मोठ्या पावसाअभावी नदी-नाले कोरडेच; रिमझिम पावसाने पिकांना दिलासा!
सलग पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी टंचाईची भिती
मानोरा (Manora Rain) : मानोरा तालुक्यात पावसाळ्याला जवळपास दोन महिने पूर्ण होऊनही समाधानकारक व सलग पाऊस झालेला नाही. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरींमुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी नदी-नाले, ओढे, तलाव आणि बोअरवेलमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जून अखेरीस झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस, मूग यांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने जवळपास 15 दिवस दडी मारल्याने पिके करपण्याची वेळ आली होती. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या हलक्या पावसामुळे पिकांची वाढ पुन्हा सुरू झाली असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र नदी-नाले, ओढे आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. भूजल पातळी वाढलेली नसल्याने विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची आवकही अत्यल्प आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. दररोज आभाळ भरून येत असले तरी रिमझिम पावसाशिवाय दमदार पाऊस होत नसल्याने शेतीचे नियोजन विस्कळीत होत आहे. खतांचा वापर, तणनाशकांची फवारणी आणि इतर शेतीकामांवरही त्याचा परिणाम होत आहे. येत्या काही दिवसात मुसळधार (Manora Rain) व सलग पाऊस झाला नाही, तर खरीपाबरोबरच रब्बी हंगामालाही फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे आणि पाणी बचतीचे नियोजन तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.