गंगाखेड शहरात पतीपासून विभक्त राहणाऱ्या २७ वर्षीय

परभणीत लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; चार वेळा गर्भपात घडवल्याची तक्रार

Marriage Promise Fraud

गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परभणी (Marriage Promise Fraud) : गंगाखेड शहरात पतीपासून विभक्त राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेला गर्भवती राहिल्यानंतर चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा तसेच लग्नास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी (५ जून) रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत मतभेद झाल्याने संबंधित महिला गंगाखेड शहरातील तिच्या मावशीकडे वास्तव्यास होती. याच दरम्यान विनायक ज्ञानोबा चव्हाण (वय ३६, रा. ढवळकेवाडी, ता. गंगाखेड) याने तिच्याशी ओळख वाढवून प्रेम व्यक्त केले आणि लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, २८ एप्रिल २०२२ ते २३ मे २०२६ या कालावधीत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत संबंधित महिलेशी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्या मावशीच्या घरासह शहरातील अन्य दोन ठिकाणी वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या संबंधातून महिला गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्नासाठी गर्भपात करण्याची अट घातल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. गर्भपातासाठी लागणारी इंजेक्शने आणि औषधे जबरदस्तीने देत तिचा तब्बल चार वेळा गर्भपात करण्यात आल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे.

तसेच, लग्नाबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला. पुन्हा लग्नाचा विषय काढल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

या प्रकरणी २७ वर्षीय विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून विनायक ज्ञानोबा चव्हाण याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव सानप करीत आहेत.