Parbhani-Hingoli Legislative Council: परभणी व हिंग

परभणी-हिंगोली विधान परिषद: ६ केंद्रांवर शंभर टक्के मतदान, एकूण ९९.७९ टक्के नोंद

Parbhani-Hingoli Legislative Council

हिंगोली जिल्ह्यात १०० टक्के मतदान

हिंगोली (Parbhani-Hingoli Legislative Council) : परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून २०२६ रोजी झालेल्या मतदानात ७ पैकी ६ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडलेल्या या प्रक्रियेत एकूण ९९.७९ टक्के मतदानाची नोंद झाली. महायुतीचे उमेदवार सईद खान, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ४६६ मतदार होते. त्यापैकी ४६५ मतदारांनी मतदान केले. 

केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी अशी : तहसिल कार्यालय परभणी येथे एकूण १२८ मतदार होते. ५१ पुरुष आणि ७७ महिलांनी मतदान केले. येथे १०० टक्के मतदान झाले.  तहसिल कार्यालय सेलू येथे ५९ पैकी ५८ मतदारांनी हक्क बजावला. ३० पुरुषांपैकी २९ आणि २९ पैकी सर्व महिलांनी मतदान केले. येथील मतदान ९८.३१ टक्के नोंदवले गेले. या निवडणुकीत एकमेव मत न पडलेले हे केंद्र ठरले. तहसिल कार्यालय गंगाखेड येथे ३४ पुरुष व ३९ महिला अशा एकूण ७३ मतदारांनी मतदान केले. येथे १०० टक्के मतदान झाले. तहसिल कार्यालय पाथरी येथेही १०० टक्के मतदान झाले. येथे ३४ पुरुष आणि ४० महिला अशा ७४ मतदारांनी मतदान केले. तहसिल कार्यालय हिंगोली येथे २६ पुरुष व ३२ महिला अशा एकूण ५८ मतदारांनी मतदान केले. येथेही शंभर टक्के मतदान झाले.

तहसिल कार्यालय कळमनुरी येथे सर्वात कमी २३ मतदार होते. १२ पुरुष आणि ११ महिला मतदारांनी मतदान करून येथेही १०० टक्के मतदानाची नोंद केली. तहसिल कार्यालय वसमत येथे २५ पुरुष आणि २६ महिला अशा ५१ मतदारांनी मतदान केले व १०० टक्के मतदान झाले. एकूण २१२ पुरुष मतदारांपैकी २११ जणांनी मतदान केले. त्यामुळे पुरुषांची टक्केवारी ९९.५३ राहिली. तर २५४ महिला मतदारांपैकी सर्व २५४ महिलांनी मतदान केल्याने महिलांचे १०० टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे यांच्यासह महायुती व महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी सकाळ पासूनच मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित केले होते. १०० टक्के मतदान करून घेण्यासाठी दोन्ही गटांकडून नगरसेवकांशी सातत्याने संपर्क करण्यात आला. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने दिवसभर चुरस पाहायला मिळाली. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.