बुलेटची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू, एक गंभीर
पाथरी तालुक्यातील सुरताबाई तांडा पाटीजवळील अपघात
परभणी (Bullet Bike Accident) : पाथरी तालुक्यातील भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकल चालकाने दुसर्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १३ जुलै रोजी सायंकाळी सात ते साडे सात या दरम्यान पाथरी तालुक्यातील सुरताबाई तांडा पाटीजवळ घडली. या प्रकरणी १४ जुलैला बुलेट चालकावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. १३ जुलै रोजी सायंकाळ च्या सुमारास फिर्यादीचे भाऊ नामदेव रंगनाथ जाधव, चुलता रावसाहेब दासू जाधव हे (Bullet Bike Accident) दुचाकीवरुन बाभळगाव फाटा येथे काही सामान आणण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या वेळी संबंधितांचा अपघात झाला. नामदेव जाधव व रावसाहेब जाधव यांना पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून नामदेव जाधव यांना मृत घोषीत केले तर रावसाहेब जाधव यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बुलेट मोटारसायकल चालक बळीराम रंगनाथ रणेर याच्यावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.