राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त नागपुरात 'कविता विद्रोहाची' आणि 'समतेचा जागर' कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर () : सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांचा वारसा जपणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात दोन विशेष सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजप्रबोधनाच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमांमध्ये शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव, सामाजिक परिवर्तनाचे विचार आणि विद्रोही कवितांद्वारे जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे.
दिनांक 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजता उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे 'कविता विद्रोहाची' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध दंगलकार नितीन चंदनशिवे आपल्या दमदार कवितांद्वारे सामाजिक विषमता, अन्याय आणि परिवर्तनाच्या लढ्याचा आवाज बुलंद करणार आहेत.
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते इंजि. प्रकाश गडपायले तसेच मूलनिवासी संघटकचे संपादक जीवन गावंडे उपस्थित राहणार असून ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्यावर मार्गदर्शन करणार आहेत. शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याची माहिती आणि आजच्या काळातील त्यांचे महत्त्व यावर ते आपले विचार मांडतील.
याच (Rajarshi Shahu Maharaj Jayanti) जयंतीनिमित्त 27 जून रोजी सायंकाळी 6 वाजता निळाई परिवाराच्या वतीने 'समतेचा जागर' कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉल, आवळे बाबू चौक, लष्करी बाग, नागपूर येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी ई. मो. नारनवरे यांच्या हस्ते होणार असून एस. जी. मंडपे आणि तेजेंद्र मेश्राम हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी दिलेल्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साहित्य, कविता आणि वैचारिक चर्चेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून परिवर्तनाची प्रेरणा देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
बेझनबाग मित्र मंडळ, पी.ए. फाउंडेशन, कलापथीक सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्था, नमामि प्रकाशन आणि युथ फॉर रेव्होल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागपूर व परिसरातील प्रबुद्ध नागरिक, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.