परभणीत शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी
पालम तालुक्यातील घटना; परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल...!
परभणी (Parbhani Farm Dispute) : पालम येथे शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडे चार ते सायंकाळी पाच या दरम्यान पालम तालुक्यातील राहटी शेत शिवार, भोगाव या ठिकाणी घडली. दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरुन पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिला शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, आरोपींनी संगणमत करत फिर्यादी व तिच्या सासूला तुम्ही आमच्या शेताचा धुरा का काढत आहात, असे म्हणाले असता आम्ही धुरा काढला नाही, असे उत्तर दिल्यानंतर आरोपींनी हातातील कत्ती, दगडाने मारहाण करत जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खंडू दत्ता लांडे, यमुनादास सोपान लांडे, मंगेश सुरेश लांडे, परमेश्वर पांडुरंग लांडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. लोखंडे करत आहेत. तर दुसरी तक्रार खंडू दत्तराव लांडे यांनी दिली आहे.
आरोपींनी संगणमत करत फिर्यादी व त्यांचा मुलगा गोरखनाथ लांडे यास तुम्ही कोण आमच्या शेतीचे भांडण मिटविणारे, असे म्हणत शिवीगाळ करत दगडाने मारुन जखमी केले. गोरखनाथ लांडे याला विळ्याने मारुन जखमी केले. तुम्ही जर आमच्या भांडणात आलात तर तुम्हाला खतम करु टाकू, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या (Parbhani Farm Dispute) प्रकरणी उत्तम शिंदे, राजू उत्तम शिंदे, ज्ञानोबा तातेराव ढगे, नामेदव रामजी ढगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. बले करत आहेत.