UCO Bank ATM: नव्या मोंढा एटीएमवर सीसीटीवी कॅमेराव

परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

UCO Bank ATM

नजर ठेवत चोरी केल्याचा पोलिसाचा संशय 

नवा मोंढा येथील युको बँकेच्या एटीएमवर पहाटे धाडसी चोरी; कोतवाली पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी (UCO Bank ATM) : शहरातील नवा मोंढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी युको बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घुसून सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चिखल लावत त्याची दिशा बदलली. त्यानंतर एटीएम मशीनची तोडफोड करून तब्बल ५ लाख ५६ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

परभणी शहरातील नवा मोंढा परिसरातील पुरोहित भवन येथे असलेल्या युको बँकेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी करत तब्बल ५ लाख ५६ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (१ जुलै) पहाटे ३.०८ ते ३.३६ वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी प्रथम एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल फासला व कॅमेऱ्याची दिशा बदलली. त्यानंतर एटीएम मशीनची तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करून मशीनमधील रोकड चोरून नेली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी युको बँकेचे नवा मोंढा शाखा व्यवस्थापक अरविंद कुमार पांडेय यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ३५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३२४(४) सह विविध कलमान्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माजीद शेख यांच्याकडे सोपविण्यात आला असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.