परभणीतील झरी येथे ऑटो-पिकअपचा अपघात
उपचारादरम्यान एकाचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण जखमी ...!
परभणी (Auto-Pickup accident) : झरी येथे गुरुवार २५ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान ऑटो आणि छोटा हत्ती पिकअप वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, झरी येथून परभणीकडे जाणारा ऑटो आणि मेंढ्या-शेळ्या घेऊन परभणीकडे जाणारा छोटा हत्ती पिकअप (क्रमांक एम.एच ०५ ईएल ७४९३) हे दोन्ही वाहने एकाच दिशेने जात होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समोर अचानक काहीतरी आल्याने पिकअप चालकाने जोरात ब्रेक लावले. त्याचवेळी पाठीमागून येणार्या ऑटोने पिकअपला जोरदार धडक दिली.
या अपघातात झरी येथील किरण देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ऑटोमधील इतर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहीका चालक दिनेश बिरगड यांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना त्वरित परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.