कापडसिंगीतील मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी अटकेत
सुमारे ६.९२ लाखांच्या अपहाराचा आरोप; न्यायालयाकडून ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
सेनगाव (MNREGA financial irregularities case) : सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी ग्रामपंचायती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सेनगाव पोलिसांनी मुख्य आरोपी आत्माराम किसन साबळे रा. कापडसिंगी याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी अशोक रामकृष्ण मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमान्वये सहाय्यक अभियंता व रोजगार सेवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून कापडसिंगी येथील लाभार्थ्यांच्या नावावर बनावट मास्टर कार्ड, जॉब कार्ड, मूल्यांकन व मार्कआऊटसह अन्य कागदपत्रे तयार केली. संबंधित अधिकारी व रोजगार सेवकांनी आवश्यक देखरेख न केल्याचा फायदा घेत पाच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाल्याचे दर्शवून शासनाची ६ लाख ९२ हजार १५७ रुपयांची फसवणूक व अपहार केल्याचा आरोप आहे.
या (MNREGA financial irregularities case) गुन्ह्यात आत्माराम किसन साबळे रा. कापडसिंगी आणि कालिदास भवानीदास देशपांडे रा. लोहगाव, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, पोलीस तसेच पोलीस कर्मचारी तुळशीराम वंजारे यांच्या पथकाने ६ जुलै रोजी मध्यरात्री कापडसिंगी येथून आत्माराम साबळे याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीसाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गैरव्यवहारात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.