पर्यावरण दिनानिमित्त मानोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष दिंडी; वृक्षारोपण व जनजागृती रॅली उत्साहात!
मानोरा (World Environment Day) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ५ जून रोजी मानोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत पोहरादेवी येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यानिमित्त गावातील नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण जनजागृती रॅली तसेच वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या अग्रभागी बंजारा समाजातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या घोषणा देण्यात आल्या. ढोल-ताशे व पारंपरिक वाद्यांच्या निनादात काढण्यात आलेल्या वृक्ष दिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. "झाडे लावा, झाडे जगवा", "पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. (World Environment Day) रॅलीदरम्यान नागरिकांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची गरज तसेच अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटते वनक्षेत्र यांचा विचार करता प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले. हा (World Environment Day) कार्यक्रम मानोरा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला क्षेत्र सहाय्यक आर. बी. सोनवणे, वनरक्षक अनिल राठोड, प्रितेश वानखेडे, सुभाष नाटकर, पांडुरंग बर्गे, सिमा पालियाड, पर्यावरण मित्र निखिल चव्हाण तसेच पोहरादेवी येथील सर्व वनमजूर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.