सततच्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात रस्ता खचल्य

माळशेज घाटात रस्ता खचला; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, प्रशासनाकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Malshej Ghat

मुसळधार पावसाचा फटका; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील करंजाळे परिसरातील घटना, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

अहिल्यानगर : सततच्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात रस्ता खचल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण–माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील करंजाळे गावाच्या हद्दीत रस्त्याचा काही भाग खचला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर आणि पुणे येथून माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली.

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ता आणखी खचण्याची शक्यता निर्माण झाली असून, अपघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक रोखली आहे. वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

माळशेज घाटातून दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक, प्रवासी तसेच मालवाहतूक केली जाते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घाटातील वाहतूक तात्पुरती पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, आळेफाटा–नारायणगाव–खेड–चाकण–तळेगाव (एमआयडीसी)–लोणावळा–खोपोली–मुंबई या पर्यायी मार्गाचा वापर वाहनचालकांनी करावा. पुढील सूचना मिळेपर्यंत माळशेज घाट मार्ग टाळण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.