पावसाळी सहल ठरली अखेरची! रिधोरा धरणात बुडून वर्ध्यातील दोन मित्रांचा मृत्यू
'फिरून येतो' म्हणत घराबाहेर पडले... पण परतले ते निर्जीव अवस्थेत; पावसाळी पर्यटन करणाऱ्यांसाठी मोठा इशारा
सेलू (Ridhora Dam Death) : पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग, धरणातील पाणी आणि मित्रांसोबतची मौजमजा… पण एका चुकीच्या निर्णयाने दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा धरणात आंघोळीसाठी उतरलेल्या वर्धा शहरातील दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतांमध्ये ओम वरठी (३८, रा. सावजी नगर, वर्धा) आणि राकेश अंडसकर (३४, रा. आदिवासी कॉलनी, वर्धा) यांचा समावेश आहे. ते आपल्या दोन मित्रांसह पंचधारा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते.
निसर्गाचा आनंद घेत असताना त्यांनी (Ridhora Dam Death) धरणाच्या पाण्यात उतरून आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे खोल पाण्यात गेले आणि काही क्षणांतच काळाने त्यांना गाठले. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा करत गावात धाव घेत मदत मागितली. गावकरी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रिधोरा येथील पांडुरंग कुरवाडे यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत सर्व काही संपले होते. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांचे ठाणेदार पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक धनंजय पांडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर मुडे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दोन मित्र सकाळी घरातून आनंदाने बाहेर पडले होते. कुटुंबीयांना कदाचित कल्पनाही नसेल की, काही तासांत त्यांच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. दोन कुटुंबांचे आधार हिरावून नेणारी ही घटना प्रत्येकासाठी सावध करणारी आहे.