परभणीत जिल्हा परिषदेने शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल रखडला...!
शिक्षण विभागाचा गलथान कारभार परीक्षा परिषदेकडून निकाल राखीव....!
परभणी (Parbhani Zilla Parishad) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचा निकाल जाहीर झाला असला, तरी परभणी जिल्ह्याचा निकाल अद्यापही राखीव ठेवण्यात आला आहे. परीक्षा शुल्काची संपूर्ण रक्कम परीक्षा परिषदेकडे वर्ग न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. यंदा शासनाने पूर्वीच्या पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १५५ परीक्षा केंद्रांवर एकूण २७ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्याचे निश्चित करण्यात आले होते. यासाठी सुरुवातीला २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
मात्र, परीक्षार्थ्यांची संख्या वाढल्याने एकूण ३३.४३ लाख रुपयांची गरज लागली. त्यामुळे उर्वरित ८.४३ लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आली. मात्र, या मंजुरीची अनुपालन प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने परीक्षा परिषदेकडे संपूर्ण शुल्क वर्ग करता आले नाही. शुल्क न भरल्याने परभणी जिल्ह्यातील हजारो जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अनुपालनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, थकीत परीक्षा शुल्क परीक्षा परिषदेकडे वर्ग करावे आणि परभणी जिल्ह्याचा शिष्यवृत्ती निकाल त्वरित जाहीर करावा, अशी मागणी पालक, विद्यार्थी यांच्याकडून होत आहे.
निकाल लवकरच जाहीर होईल याबाबत शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांना विचारले असता येत्या काही दिवसांत शुल्क भरण्यात येणार आहे. पत्र दिल्यावर निकाल जाहीर करण्याचे परीक्षा परिषदेने मान्य केले आहे. उद्या तसे पत्र देऊन जिल्ह्याचा निकाल जाहीर करण्याची विनंती केली जाणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर होईल. - शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे.