कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांचा अंत बघू नका; कणखर यांचा सरकारला इशारा
तुपकरांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा; रस्त्यावर उतरण्याचा इशारा
चिखली (Farmers' Loan Waiver Andolan) : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा व बाजारपेठेचे स्वातंत्र्य यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते मा. रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. तुपकरांच्या या आंदोलनाला दुसरा दिवस उजाडला तरी सुद्धा आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने गावा गावातील शेतकरी आक्रमक होतांना दिसत असून रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला असून शेतकरी संघटना बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी आज तहसीलदार चिखली यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन दिले. निवेदनात तुपकरांच्या आंदोलनातील मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात कणखर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी आज आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे. शेती उत्पादनाचा वाढता खर्च, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती तसेच कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत, काही (Farmers' Loan Waiver Andolan) शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.शेतकऱ्यांचा अंत बघू नका रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची वेळीच दखल घ्या अन्यथा रस्त्यावर उतरु असा थेट इशारा देत कणखर यांनी सरकारकडे सरसकट कर्जमुक्ती* देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा.हक्काचा पीकविमा शेतकऱ्यांना देण्यात यावा, शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे, जगातील तंत्रज्ञान व बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात यावे,यासह आदि मागण्यांचे निवेदन त्यांनी दिले आहे.
'तिव्र आंदोलन छेडू - देविदास कणखर
कणखर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सांगितले की, महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि पुढील (Farmers' Loan Waiver Andolan) आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार व प्रशासनाची राहील. यावेळी शेतकरी संघटनेचे ठाकूर सुनाजी लुदे, प्रकाश येडूजी धुळे,विनायक सरनाईक, बाजार समिती संचालक गणेश थुट्टे,राजु शेटे, मुरलीधर येवले,धोडु सोळंकी, विनोद थुट्टे,नरहरी थुट्टे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.